पहिल्या टप्प्यातील मतदान ; उमेदवारांचे भवितव्य ‘मतपेटीत’ बंद

मुुंबई – 17 वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 91 मतदारसंघात मतदान घेण्यात आले. यामध्ये विदर्भातील सात मतदारसंघाचा समावेश होता. लोकसभा निवडणुकांच्या पहिला टप्पा पार पडला असल्याने आता भाजपाचे नितीन गडकरी व हंसराज अहिर या दोन केंद्रीय मंत्र्यांबरोबरच कॉंग्रेसचे नाना पटोले, मावळते खासदार रामदास तडस, भावना गवळी, कृपाल तुमाने व अशोक नेते या दिग्गज्जांचे राजकीय भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झाले आहे.
सतराव्या लोकसभेसाठीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम अशा सात मतदारसंघात मतदान झाले.
नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान
गडचिरोली- चिमूर, गोंदिया या लोकसभा मतदार संघातील दुर्गम भागात असणाछया आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी आणि अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदार संघात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तीन हेलिकॉप्टर्स देखील तैनात केली होती मात्र मतदानावरून परतत असताना गडचिरोली आणि एटापल्ली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये दोन जवान जखमी झाले झाले असल्याने पहिल्या टप्प्यातील निवडणुकांना गालबोट लागले.