पहिल्याच पावसात रेल्वे फ्लॅटफॉर्म पाण्यात !

- स्टेशन सुधारण्याच्या बाजारगप्पा : ट्यूबलाइट, फॅन, बाकांवरही पावसाच्या धारा
आडोसा शोधणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल
पुणे – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसाने बुधवारीही जोरदार तडाखा दिला. या पावसाने पुणे स्टेशनच्या विकासाचा फुगा फुटला असून जवळपास सर्वच फ्लॅटफॉर्मला गळती असल्याचे दिसून आले. पावसापासून बचाव करण्यासाठी आडोसा शोधणाऱ्यांची मात्र, या पावसाने चांगलीच गोची झाली. त्यामुळे स्टेशन सुधारण्यासाठी सुरू असलेले कागदी प्रयत्न हे बाजारगप्पाच असल्याचे समोर आले आहे.
पावसामुळे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मला गळती सुर झाल्याने गाड्यांची वाट पाहत खुर्चीवर बसलेल्या प्रवाशांना अडोसा शोधावा लागला. प्लॅटफॉर्मवर असलेल्या ट्युबलाईट, फॅनवरदेखील गळती असल्याने प्लॅटफॉर्म असुरक्षित असल्याचे दिसले. पावसाळ्याच्या तोंडावरच अशी अवस्था असल्याने यापुढील काळात याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
पुणे रेल्वे स्टेशनवरुन रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखांत आहे. त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी रेल्वेची आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने स्थानकांचा आढावा घेऊन पावसाळ्यापूर्वीची कामे करणे गरजेचे आहे. मात्र, बुधवारच्या पावसाने काही वेळातच फ्लॅटफॉर्मला गळती लागली. यामुळे नागरिकांचे हाल झाले. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर नागरिकांना बसण्यासाठी प्रशासनाने बाक उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बाकावरील प्रवाशांनाही अडोसा शोधत उभे राहवे लागल्याची परिस्थिती पाहायला मिळाली.
दरम्यान, रेल्वे स्थानकातील सर्वांत मोठ्या पादचारी पुलाचे काम सुरू असल्याने काही प्रमाणात गैरसोय होत आहे. हे काम जूनअखेर पूर्ण होऊन तो पूल नागरिकांसाठी खुला होणार असल्याचे सांगितले जात आहे.