पश्चिम आफ्रिकेतल्या देशांमध्ये 200 दहशतवाद्यांना अटक

ओयागादोगौ (बुर्किना फासो) – पश्चिम आफिकेतल्या बुर्किना फासो, घाना, बेनिन आणि तोगो या देशांमध्ये गेल्या आठवड्याभरात सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईदरम्यान 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी बुर्किना फासोमध्ये 52, बेनिममध्ये 42. तोगोमध्ये 95 आणि घानामध्ये 13 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कर्नल ब्लाईस ओएद्रोगो यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले.
या कारवाईदरम्यान सुरक्षा रक्षकांनी स्फोटके आणि घातपाती कारवायांची सामुग्रीही जप्त केली आहे. यामध्ये स्फोटकांच्या 40 कांड्या, 38 बंदुका आणि 623 अवैधरित्या नोंदणी केलेल्या मोटरसायकलींचा समावेश आहे. या कारवाईमध्ये चार देशांमधील 2,900 सुरक्षा रक्षक आणि संरक्षण अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. बुर्किना फासोमध्ये अटके केलेल्यांपैकी दोघे जण जिहादी गटांशी संबंधित असल्याचा संशय आहे.
या चारही देशांच्या नेत्यांनी गेल्यावर्षी घानाच्या राजधानीमध्ये एक करार करून संयुक्त कारवाई करण्याचे मान्य केले होते. भविष्यात अशी कारवाई पुन्हा केली जाईल, असे बुर्किना फासोच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.