पर्यावरणीय प्रश्नांची दाहकता कमी करण्यासाठी वृक्षलागवड करा; नगरसेवक तुषार हिंगे यांचे आवाहन

पिंपरी- वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पर्यायी पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज आहे. पर्यावरणाचे संरक्षण केवळ सरकारची जबाबदारी नसून भविष्यातील धोके टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनाची सुरूवात स्वत:पासून करणे गरजेचे आहे. वृक्षलागवड करा, असे आवाहन नगरसेवक तुषार हिंगे यांनी केले.
पिपरी-चिंचवड महापालिका, वृक्ष प्राधिकरणातर्फे शनिवारी (दि. 27) चिंचवड येथे आयोजित केलेल्या वृक्षारोपण जनजागरण सभेत ते बोलत होते. शहर सुधारणा समितीच्या सभापती सीमा चौघुले, नगरसेवक शीतल शिंदे, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, ‘ह’ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, प्रभाग समिती स्विकृत सदस्य कुणाल लांडगे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंके, वृक्ष मित्र भय्यासाहेब लांडगे, पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील, उद्यान अधिक्षक दत्तात्रय गायकवाड, संस्कार प्रतिष्ठानचे डॉ. मोहन गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष सुर्यकांत मुथियान, वृक्षमित्र अमोल देशपांडे, सचिन काळभोर यांच्यासह मोठ्या संख्येने वृक्षप्रेमी यावेळी उपस्थित होते.
नगरसेवक तुषार हिंगे म्हणाले की, वातावरणीय बदल यामुळे निसर्गचक्र बदलताना दिसत आहे. वाढते तापमान, कुठे नद्यांना पूर, दुष्काळ तर कुठे गारपीट यासारख्या संकटाना सामोरे जावे लागत आहे. पिंपरी चिंचवड शहरात वृक्षलागवड करण्यासाठी मोकळी जागा, मोकळी मैदाने, गार्डन, प्रभाग, रस्त्याच्या बाजूने या ठिकानचा सर्वे केला जाणार आहे. याबाबत नियोजनही केले जाणार आहे. वृक्ष लागवड करून ते संवर्धन करण्यासाठी मोहीम उभारावी, असे आवाहन नगरसेवक हिंगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.