breaking-newsमुंबई

परराज्यातील ‘फार्मासिस्ट’ना नोंदणीसाठी परीक्षा बंधनकारक

राज्य औषधनिर्माणशास्त्र परिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णय

बोगस फार्मासिस्टना चाप लावण्यासाठी आता परराज्यातून औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) विषयात पदवी किंवा पदविका केलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा लागू करण्याचा निर्णय राज्य औषधनिर्माणशास्त्र परिषदने (एमएसपीसी) घेतला आहे. नोंदणी करण्यापूर्वी ही परीक्षा देणे बंधनकारक असून यामध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची नोंदणी केली जाणार नाही.

परराज्यातून दहावी, बारावीची खोटी प्रमाणपत्रे प्राप्त करून अवैधरीतीने फार्मासिस्ट म्हणून नोंदणी केलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परराज्यातून येणाऱ्या बोगस फार्मासिस्टवर रोख लावण्यासाठी यांच्या नोंदणीसाठी कडक र्निबध परिषदेने फेब्रुवारीपासून लागू केले आहेत.

राज्य परिषदेने २००५ मध्ये परीक्षाही सुरू केली होती. मात्र काही वर्षांतच परीक्षा बंद करून कायद्यानुसार, १८ वर्षे पूर्ण, राज्यात वास्तव्य किंवा व्यवसाय आणि पदवी किंवा पदविकाचे प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीला नोंदणी करण्याचा हक्क आहे ,असे कळवित भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) परीक्षा घेण्यावर बंदी आणली गेली. मात्र पुन्हा आता परिषदेने ही परीक्षा सुरू केली असून पीसीआयला याबाबत कळविले आहे. तसेच सर्व राज्याच्या परिषदेलाही विद्यार्थ्यांची नोंदणी करणे किंवा पात्रता प्रमाणपत्र देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती एमएसपीसीच्या रजिस्टार सायली मिसाळ यांनी दिली.

पीसीआयकडून फार्मासिस्टसाठी नोंदणी करण्यापूर्वी इक्झिट परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ही परीक्षा लागू होईपर्यंत राज्याच्या पातळीवर परीक्षा घेतली जाईल, असेही पुढे मिसाळ यांनी स्पष्ट केले.

फार्मसीची पदवी किंवा पदविका प्राप्त केलेल्या राज्यातून त्या काळात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलीसांचे ना हरकत प्रमाणपत्र आणि त्या राज्यातील औषधनिर्माणशास्त्र परिषदेकडे नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करण्यापूर्वी इतर कागदपत्रांसह ही दोन कागदपत्रे सादर करणे आवश्यक असेल. त्या राज्यातील परिषदेने नोंदणी करण्यास नकार दिल्यास तिथे पदवी किंवा पदविका पूर्ण केल्याचे पात्रता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या सोबतच अर्जदाराची १५ गुणांची परीक्षा घेतली जाईल. परीक्षा आणि दोन कागदपत्रांची अट पूर्ण करणाऱ्या उमेदवाराची नोंदणी करण्यासाठी अर्ज स्वीकारला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button