breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

पतंजलीच्या आवळा ज्यूस विक्रीवर आर्मी कॅन्टिनमध्ये बंदी!

नवी दिल्ली : आर्मीच्या कॅन्टिन स्टोअर्स विभागाकडून (सीएसडी) योगगुरू रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीच्या पतंजली आवळा ज्यूसच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या उत्पादनासंबंधी एका सरकारी प्रयोगशाळेकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिकूल अहवालानंतर कॅन्टिन विभागाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. हे उत्पादन आर्मीच्या कोणत्याही कॅन्टिनमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येऊ नये, असे आदेश सीएसडीने आपल्या एकूण ३९०१ कॅन्टिन्स आणि ३४ भांडारांना ३ एप्रिलला पत्राद्वारे दिले असून शिल्लक राहिलेला माल परत करण्यासाठी अधिकृत डेबिट नोट बनविण्यात यावी असेही पत्रात नमूद केले आहे.
पतंजलीने बाजारात दाखल केलेल्या सुरूवातीच्या उत्पादनांमध्ये आवळा ज्यूसचाही समावेश होता. या उत्पादनाला इतका भरघोस प्रतिसाद मिळाला की त्यामुळे कंपनीला आपली दोन डझनहून अधिक उत्पादनं बाजारात आणण्यासाठी मदत मिळाली. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आवळा ज्यूस उत्पादनाच्या तुलनेत पतंजली आवळा ज्यूस आरोग्यासाठी अधिक चांगला असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला होता. मात्र प्रकरणाची माहिती असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘कोलकाताच्या सेंट्रल फूड लॅबोरेटरीमध्ये या उत्पादनाची तपासणी करण्यात आल्यानंतर तपासणीत हे उत्पादन पिण्यायोग्य नसल्याचे आढळून आले. त्यानंतर पतंजलीने आर्मीच्या सर्व कॅन्टिन्समधून आवळा ज्यूस उत्पादन परत घेतले आहे.’
आपल्या उत्पादनांसंबंधी केलेल्या दाव्यांच्या नियामवलींच्या वादात अडकण्याची पतंजली आयुर्वेद कंपनीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तर विना परवाना नूडल्स आणि पास्ता विकल्यामुळेही कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. गेल्या वर्षी FSSAIने सेंट्र लायसेसिंग अॅथॉरिटीला पतंजलिच्या खाद्यतेल उत्पादनांच्या जाहिरातींमधून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप करत त्याबाबत कारणे दाखवा नोटिस बजावण्याचेही आदेश दिले होते.
आपल्या आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक उत्पादनांच्या तुलनेत इतर कंपन्यांच्या त्याच उत्पादनांमध्ये रसायनांचा वापर होत असल्याचे सांगत आपल्या उत्पादनांचे मार्केट वाढविण्याचा प्रयत्न पतंजली करत आली आहे. मात्र पतंजली आवळा ज्यूसच्या प्रयोगशाळेतील चाचणीनंतर सीएसडीला आपल्या १.२ कोटी ग्राहकांच्या जीवाशी खेळणे परवडणारे नसल्याने त्यांनी हे उत्पादन सर्व सीएसडी कॅन्टिन्समधून परत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button