breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पतंगराव कदम म्हणतात…शरद पवारांनी चुकीच्या माणसांना मदत केली!

मुंबई : शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत दोन चुका केल्या नसत्या तर ते पंतप्रधान झाले असते, अशा शब्दांत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांनी पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासावर कटाक्ष टाकला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे आणि शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कारकिर्दीला ५५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करणारा अभिनंदन ठराव शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी विधानसभेत मांडला. या ठरावावरील चर्चेत भाग घेताना पतंगराव कदम यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पवारांच्या कार्याचा गौरव केला.
शरद पवार हे काँग्रेसमध्ये वजनदार आणि प्रभावी नेते होते. मात्र, त्यांनी दोन चुका केल्या. एक म्हणजे ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि दुसरी चूक म्हणजे १९९२-९३मध्ये देशाचे संरक्षण मंत्री असताना ते संरक्षण मंत्रीपद सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या राजकारणात परतले. पवारांच्या या दोन चुकांमुळेच ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत आणि महाराष्ट्राची मोठी संधी हुकली असे पतंगराव म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता होती आणि नंतर शरद पवार हे पंतप्रधानपदासाठी सक्षम नेतृत्व आहे, असे माझे मत आहे. म्हणूनच पवारसाहेब पंतप्रधान झाले नाहीत, याची सल त्यांचा चाहता म्हणून माझ्या मनात नेहमीच राहील, असेही पतंगरावांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button