“पढो परदेश’ अंतर्गत महाराष्ट्रातील 234 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना लाभ

नवी दिल्ली – अल्पसंख्याक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्जावर सूट देणाऱ्या केंद्र शासनाच्या “पढो परदेश’ योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातील 234 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
अल्पसंख्याक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर शिक्षण, एमफील व पीएचडी हे संशोधनात्मक अभ्यास पूर्ण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने “पढो परदेश’ योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वर्ष 2014-15 ते 2016-17 या कालावधीत देशभरातील 36 राज्य व केंद्र शासित प्रदेशातील एकूण 3 हजार 687 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. यात महाराष्ट्रातील 234 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारसी आणि शीख या अल्पसंख्याक समाजातील गुणवान मुला-मुलींना “पढो परदेश’ योजनेंतर्गत शैक्षणिक कर्जाच्या व्याजातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. राज्यात जैन समाजातील सर्वात जास्त 99 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मुस्लिम समाजातील 53, ख्रिश्चन समाजातील 44, शीख समाजातील 23, बौद्ध समाजातील 9 तर पारसी समाजातील 6 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
“पढो परदेश’ योजनेंतर्गत देशातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण, एमफील व पीएचडी’ हे संशोधनात्मक अभ्यास पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या शैक्षणिक कर्जावरील व्याज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने भरण्यात येते. मंत्रालयाच्या वतीने परदेशात शिक्षणासाठी ठरवून दिलेल्या एकूण 41 विषयांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. वर्ष 2006 मध्ये “पढो परदेश’ योजनेला सुरुवात झाली असून बॅंक आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयामध्ये या योजनेसंदर्भात झालेल्या सामंजस्य करारानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येते.