पगारवाढीबाबत सोशल मीडियावर तक्रार केल्याने पोलीस सब इन्स्पेक्टर निलंबित

सतना(मध्य प्रदेश) – पगारवाढीबाबत सोशल मीडियावर तक्रार करणे सतना येथील पोलीस सब इन्स्पेक्टर आर के जयस्वाल यांना महगात पडले आहे. सरकारने मध्य प्रदेश पोलीस कर्मचाऱ्यांची पगारवाढीबाबत फसवणूक केल्याची पोस्ट् पोलीस सब इन्स्पेक्टर जयस्वाल यांनी व्हाट्सऍपवर टाकली होती. त्यावरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सोशल मीडियापासून दूर राहण्याचे आदेश दिले होते. तरीही पोलीस सब इन्स्पेक्टर आर के जयस्वाल यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत व्हाटसऍपवर पोस्ट टाकल्याने पोलीस अधीक्षकांनी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आर के जयस्वाल यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत.
कंत्राटी कर्मचारी, शिक्षक आणि इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देऊन सरकारने पोलीस कर्मचाऱ्यांची मात्र फसवणूक केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या 15 वर्षांच्या मागण्या आजही दुर्लक्षित आहेत. त्यांच्या भत्त्यातही वाढ करण्यात आलेली नाही, असे आर के जयस्वाल यांच्या व्हाट्सऍपवरील पोस्टमध्ये लिहिलेले होते.
मात्र शनिवारी आर के जयस्वाल यांनी आपण व्हाट्सऍपवर अशा प्रकारची कोणतीही पोस्ट टाकली नव्हती. आपल्या व्हाट्सऍप अकाऊंटशी कोणीतरी छेडछाड करून ही पोस्ट टाकली आहे, त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही, असा खुलासा केला आहे.