पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर – राजनाथ

जम्मू – माओवादी नक्षलवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचे कथित वृत्त आहे. यापार्श्वभूमीवर, मोदींच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकार अतिशय गंभीर असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून बुधवारी पुणे पोलिसांनी देशाच्या विविध भागांतून पाच जणांना अटक केली. त्यातील एका आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या पत्रात मोदींच्या हत्येविषयीच्या कटाचा उल्लेख आहे.
राजीव गांधीसारखी दुसरी घटना घडवण्याचे त्या पत्रात म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे. या घडामोडीबाबत राजनाथ यांनी येथे पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. नक्षलवादी हरलेली लढाई लढत आहेत. नक्षलवाद्यांचा हिंसाचार लवकरच संपुष्टात येईल. त्यांचा याआधी देशातील 135 जिल्ह्यांमध्ये प्रभाव होता. आता तो 90 जिल्ह्यांपर्यंत खाली आला आहे. त्यातही केवळ 10 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी अधिक सक्रिय आहेत, असे ते म्हणाले.