पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीमंत उद्योगपतींचे चौकीदार-राहुल गांधी

प्रत्येकाला १५ लाख रुपये देणं शक्य नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. जे शक्य आहे तेच आश्वासन काँग्रेसने दिलं. आमचं सरकार आलं तर आम्ही ७२ हजार देणार हे तुम्हाला आश्वासन देतो आहे. २० टक्के गरीबांच्या खात्यात आम्ही पैसे जमा करणार, हे पैसे महिला आणि माता भगिनींच्या खात्यात जमा करणार आहोत. नरेंद्र मोदींनी देशातल्या १५ उद्योगपतींना मागील पाच वर्षात लाखो कोट्यवधी रूपये दिले. विदर्भाचे शेतकरी कर्जमाफी मागत आहेत, आत्महत्या करत आहेत तरीही हे सरकार कर्जमाफी देत नाही अशीही टीका राहुल गांधी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीमंत उद्योगपतींचे चौकीदार आहेत, गरीबांचे नाहीत असेही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींनी १५ उद्योगपतींचं साडेतीन लाख कोटींचे कर्ज माफ केलं असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. चंद्रपुरात काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी आले, त्याचवेळी त्यांनी हा आरोप केला. पंतप्रधान म्हणणात मी चौकीदार आहेत. चौकीदार मजूर, शेतकरी यांच्या घराबाहेर असतात का? ते अदाणी, अंबानींच्या घराबाहेर असतात. नरेंद्र मोदी यांनी श्रीमंत वर्गाचीच चौकीदारी केली. आधी अच्छे दिनचा नारा होता, या निवडणुकीच्या वेळी चौकीदार चोर है हा नारा आहे. यातूनच मोदींना लोक किती वैतागले आहेत हे दिसून येते असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी चौकीदार चोर है या घोषणाही देण्यात आल्या.
गरीबांना प्रतिवर्ष ७२ हजार देणं सहज शक्य आहे, आकाश पाताळ एक झालं तरीही चालेल मात्र आम्ही आश्वासन दिलं ते दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त उद्योगपतींचे कर्ज माफ करतात आणि जनतेशी खोटं बोलतात. जनतेची दिशाभूल केली जाते आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राफेलची किंमत आमच्या काळात ५२६ कोटी रूपये होती. आता ती वाढून १६०० कोटी रुपये झाली. या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे मोदी याबाबत खुलेपणाने बोलू शकत नाहीत. अनिल अंबानींनी कधी कागदाचे विमानही बनवले नाही तरीही राफेल करारात अनिल अंबानींचा ३० हजार कोटींचा फायदा करून दिला असेही राहुल गांधी म्हटले.
नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हसत हसत घेतला. मात्र त्या निर्णयाच्या दुष्परिणामांची जबाबदारी नरेंद्र मोदींनी घेतली नाही. अनिल अंबानी, मेहुल चोक्सी नोटा बदलून घेण्याच्या रांगेत दिसले का? असाही प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. २०१९ मध्ये आम्ही जिंकलो तर आम्ही जीएसटीची पद्धतही बदलू, एक देश एक टॅक्स आणू असेही राहुल गांधींनी म्हटले आहे. जर आमचे सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प सादर करू असेही त्यांनी स्पष्ट केले.