पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर

- पुतीन यांच्याबरोबर विविध विषयांवर चर्चा अपेक्षित
नवी दिल्ली- रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याबरोबरच्या चर्चेमुळे रशियाबरोबरच्या विशेष आणि संरक्षण भागीदारीच्या संबंधांना बळकटी मिळेल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. रशिया भेटीपूर्वी ट्विटरवर रशियन आणि इंग्रजीतून केलेल्या काही पोस्टमध्ये पंतप्रधानांनी ही आशा व्यक्त केली आहे.
सोची येथील भेटीसाठी पंतप्रधान उद्या रशियाला रवाना होत आहेत. या भेटीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी मोदी यांची चर्चा होणार आहे. पुतीन यांना भेटण्यात आपल्याला नेहमीच आनंद वाटतो, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
सोमवारी सोची शहरात दोन्ही नेत्यांमध्ये होणाऱ्या या अनौपचारिक चर्चेदरम्यान जागतिक आणि प्रादेशिक मुद्दयांवर विशेष भर दिला जाणार आहे. यात प्रामुख्याने अमेरिकेने इराण अणू करारातून बाहेर पडण्याचा भारत आणि रशियावरील परिणामाचाही समावेश असेल. मोदी आणि पुतीन यांच्यात चार ते सहा तासांसाठी अनौपचारिक चर्चा होणार असून यामध्ये द्विपक्षीय मुद्दे असण्याची शक्यता कमी आहे. या चर्चेच्या विषयांमध्ये अफगाणिस्तान आणि सीरियातील स्थिती, दहशतवादाचा धोका आणि आगामी काळात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना आणि “ब्रिक्स’ परिषदेशी संबंधित विषयांवरही चर्चा अपेक्षित आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
रशियाबरोबरच्या आण्विक सहकार्याबाबत आणि “नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कोरिडोर’प्रकल्पाबाबतही यावेळी चर्चा अपेक्षित आहे. भारताचे अमेरिकेबरोबरचे संरक्षण संबंध जरी वाढत असले तरी रशियाबरोबरच्या संबंधांबाबत अन्य कोणत्याही देशाच्या सूचना मान्य केल्या जाणार नाहीत, असे भारताने स्पष्ट केले आहे.