पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या संपत्तीत 42 टक्के वाढ

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा 26 मे 2018 रोजी स्वतःच्या चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. जनतेनं मोदींना भारताचे पंतप्रधान बनण्याचीही संधी दिली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःचा चार वर्षांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. या चार वर्षांच्या कार्यकाळात मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचेही अच्छे दिन आले आहेत. कारण लोकसभा निवडणूक 2014 नंतर मोदी सरकारमधल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे उघडकीस आले आहे.
नॅशनल इलेक्शन वॉच(एनईडब्लू) आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म 2016च्या एका रिपोर्टनुसार, मोदी मंत्रिमंडळातील 78 पैकी 72 मंत्री कोट्यधीश आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत 2014 पासून 2017 पर्यंत जवळपास 41.8 टक्के (1.41 कोटी ते 2 कोटी रुपये) वाढ झाली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री सदानंद गौडा यांच्या संपत्तीत 42.3 टक्के (4.65 कोटी रुपयांहून 6.62 कोटी रुपये) वाढ नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या संपत्तीत 2015-17 या कार्यकाळात अधिक वृद्धी झाल्याचे समोर आले आहे. 2015-17दरम्यान तोमर यांच्या संपत्तीत 67.5 टक्के (2014-15मध्ये 53 लाखांहून अधिक संपत्ती वाढून 2016-17मध्ये 89 लाख )वाढ झाली. तर मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची संपत्ती कमी झाल्याचे उघड झाले आहे. जावडेकर यांची संपत्ती 50 टक्क्यां(1.11कोटी रुपयांवरून 56 लाख रुपयां) वर आली आहे.