पंतप्रधानांनी लांगुलचालन आणि घराणेशाहीचे राजकारण संपवले – शहा

- चार वर्षपुर्ती निमीत्त भाजप अध्यक्ष अमित शहांचे प्रतिपादन
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीने देशातील लांगुलचालन आणि घराणेशाहीचे राजकारण संपवले आहे असे प्रतिपादन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. मोदी सरकारला केंद्रात सत्तेवर येऊन आज चार वर्षपुर्ण झाली. त्यानिमीत्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी बोलताना त्यांनी एनडीए सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
ते म्हणाले की सन 2016 साली मोदी सरकारने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून देशाच्या आव्हानाला धैर्याने सामोरे जाण्याचे उदाहरण घालून दिले आहे. मोदी सरकारने जातीयवाद, घराणेशाही, लांगुलचालन अशा घातक राजकारणाला तिलांजली देऊन केवळ विकासाचेच राजकारण केले आहे. ते म्हणाले की देशात बरीच वर्ष प्रलंबीत असलेला वन रॅंक वन पेन्शनचा निर्णयही मोदी सरकारने घेतला आहे.
काळ्यापैशाच्या संबंधात मोदी सरकारने एसआयटी नेमून मोठे पाउल उचलले आहे असे ते म्हणाले. मोदी सरकारने ग्रामीण भारताच्या विकासाकडे लक्ष केंद्रीत केले असून गावांचा विकास करण्यासही सरकार वचनबद्ध आहे असे ते म्हणाले.