‘नेल पॉलिश रिमूव्हर वापरलं असता मिटली बोटावरील शाई’

काँग्रेस नेते संजय झा यांनी नेल पॉलिश रिमूव्हर वापरलं असता आपल्या बोटावरील शाई मिटली असल्याचा दावा केला आहे. आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. देशभरातील नऊ राज्यांतील ७१ जागांसाठी मतदान होत आहे. राज्यातील या अखेरच्या टप्प्यात मुंबई, ठाण्यासह १७ मतदारसंघातील ३२३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य सुमारे तीन कोटी ११ लाख मतदार ठरवणार आहेत. दरम्यान एकीकडे सोशल मीडियावर मतदार बोटावर लागलेली शाई दाखवत आपण मतदानाचा हक्क बजावला असल्याचं सांगत असताना संजय झा यांनी मात्र बोटावरील शाई मिटत असल्याचा दावा केला आहे.
संजय झा यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली असून, निवडणूक आयोगाने यासंबंधी चौकशी करावी असं म्हटलं आहे.
संजय झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या एका मित्राने त्यांना नेल पॉलिश रिमूव्हर वापरलं असता बोटावरील शाई मिटत असल्याचं सांगितलं. सुरुवातील संजय झा यांनी विश्वास नाही ठेवला पण नंतर करुन पाहिलं असता खरोखरच शाई मिटत असल्याचं त्यांना दिसलं.
‘दक्षिण मुंबई माझा मतदारसंघ असून मी फक्त एका तासापूर्वी मतदान केलं होतं. मी जेव्हा परतलो तेव्हा एका मित्राने नेल पॉलिश रिमूव्हर वापरलं असता बोटावरील शाई मिटत असल्याचा मेसेज केला. माझा विश्वास बसला नाही, म्हणून करुन पाहिलं. नेल पॉलिश रिमूव्हर वापरलं असता लगेचच माझ्या बोटावरील शाई मिटली. तुम्ही माझ्या बोटावरील शाई पाहू शकता का ?’, असं संजय झा यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.