breaking-newsराष्ट्रिय

नेत्यांच्या भाऊगर्दीत कुमारस्वामी यांचा शपथविधी

  • राहुल गांधी, सोनिया, ममता, अखिलेश आणि मायावतीही उपस्थित 

  • बाकी मंत्र्यांचा शपथविधी बहुमत चाचणीनंतरच

  • विधानसभेतील बहुमत चाचणी आज

बेंगळूरु – अनेक पक्षांच्या नेत्यांच्या भाऊगर्दीमध्ये आज कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांचा शपथविधी झाला. जेडीएस आणि कॉंग्रेसच्या आघाडीचे सरकार तिथे अस्तित्वात आले आहे.

विधान सौधा कॉम्प्लेक्‍समधील समारंभात राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि दलित नेते जी. परमेश्‍वर यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

नवीन आघाडी सरकारला उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यानंतरच मंत्रिमंडळामध्ये अन्य सदस्यांना समाविष्ट करून घेतले जाणार आहे. पारंपारिक धोतर आणि शुभ्र पांढऱ्या शर्टच्या वेशभुषेतील कुमारस्वामी यांनी परमेश्‍वराबरोबर “कन्नड नाडू’ नागरिकांच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

या समारंभाला भाजपचे विरोधक असलेल्या पक्षांच्या नेत्यांची गर्दी होती. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू आणि केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन हे उपस्थित होते. बिहारमधील विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव, बसपा प्रमुख मायावती, समाजवादी नेते अखिलेश यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम येचुरी आणि समाजवादी नेते शरद यादव हे देखील शपथविधीसाठी आवर्जुन उपस्थित राहिले होते. अनेक पक्षांच्या नेत्यांच्या गर्दीतून भाजपविरोधात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपाविरोधात आघाडी उभी करण्याचे संकेत दिले गेले.

भाजपने या शपथविधीवर बहिष्कार घातला होता. जेडीएस आणि कॉंग्रेसमधील आघाडी “अपवित्र’ असल्याची टीका करून भाजपच्यावतीने राज्यभर आंदोलनही केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button