नीरव मोदी, चोक्सींची कागदपत्रे आगीत नष्ट

- मुंबईच्या आयकर कार्यालयाला आग
मुंबई – दक्षिण मुंबईतील बॅलॉर्ड इस्टेट भागात असलेल्या सिंधीया ईस्टेट या इमारतीत असलेल्या आयकर विभागाच्या कार्यालयाला शुक्रवारी अचानक लागलेल्या आगीत नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि अन्य परागंदा आरोपींशी संबंधीत कागदपत्रे जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. नीरव मोदी आणि चोक्सी हे पंजाब नॅशनल बॅंकेचे सुमारे चौदा हजार कोटी रूपये घेऊन विदेशात परागंदा झाले आहेत. त्यांच्याशी संबंधीत तपासाची कागदपत्रे या आयकर विभागाच्या कार्यालयात होती. नेमकी त्याच कागदपत्रांसह अन्यही महत्वाचा तपशील असलेली कागदपत्रे जळाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
शुक्रवारी लागलेली ही आग शनिवारी सकाळ पर्यंत धुमसत होती. या परिसरातील सात जण या आगीत वेढले गेले होंते त्यांना अग्निशमन दलाने वाचवले. शनिवारी सायंकाळी तेथील आग पुर्ण शांत झाल्यानंतर झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी आयकर विभागाचे अधिकारी तेथे पोहचू शकले. या आगीत आयकराच्या वसुली विभागाची सर्व कागदपत्रे जळाली आहेत. नीरव मोदी आणि चोक्सीची सर्व कागदपत्रे याच विभागात होंती. एस्सार र्गुपच्या करचुकवेगीरीची चौकशीहीं सध्या आयकर विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधीत फाईल्सही याच विभागात होत्या. ही आग जाणिवपुर्वक लावली गेली असावी असा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गाडगीळ यांनी केला आहे. तथापी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की या फायली जळाल्या असल्या तरी तपास कामात थोडा विलंब होण्यापेक्षा अधिक नुकसान होणार नाहीं आम्ही या फायली पुन्हा तयार करू. त्यामुळे फायली जळाल्याचा फायदा संशयीतांना होणार नाही. कागदपत्रांच्या प्रति आयकर विभागाच्या अन्य कार्यालयांमध्येही उपलब्ध असतात. त्यामुळे त्या तेथून जमा करण्यास काही कालावधी जाईल असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.