नीरव मोदीच्या कुटूंबीयांचा 52 कोटींचा विंडफार्म जप्त

नवी दिल्ली – पीएनबी घोटाळा करून देशाबाहेर पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आणखी एक दणका दिला. नीरवच्या कुटूंबीयांची मालकी असणारा 52 कोटी रूपयांचा विंडफार्म ईडीने जप्त केला.
जप्त करण्यात आलेला विंडफार्म राजस्थानच्या जैसलमेरमध्ये आहे. त्याची क्षमता 9.6 मेगावॅट वीजनिर्मितीची आहे. संबंधित फार्ममध्ये अनेक पवनचक्क्या आहेत. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्टच्या (पीएमएलए) अंतर्गत विंडफार्म जप्तीची कारवाई केली. पीएनबी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणाची चौकशी ईडीकडून केली जात आहे. या केंद्रीय यंत्रणेने आतापर्यंत नीरवची 691 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. नीरव हा पीएनबी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे. तर त्याचा मामा मेहुल चोक्सी या प्रकरणातील सहआरोपी आहे.
पीएनबी घोटाळ्याबद्दल गुन्हे दाखल होण्यापूर्वीच नीरव आणि चोक्सीने देशाबाहेर पलायन केले. त्यांनी अमेरिकेत आश्रय घेतल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यांचा नेमका ठावठिकाणा अजून समजू शकलेला नाही. ईडीबरोबरच सीबीआयही पीएनबी घोटाळ्याचा तपास करत आहे. याप्रकरणी आतापर्यंत नीरव आणि चोक्सीची मोठ्या प्रमाणात मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.