नीरव मोदीच्या कुटूंबातील चौघांना ईडीकडून समन्स

नवी दिल्ली – देशाबाहेर पलायन केलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या कुटूंबातील चार सदस्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. पीएनबी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
नीरवचे वडील दीपक मोदी, भाऊ निशाल मोदी, बहीण पूर्वी मेहता आणि तिचा पती मयांक मेहता यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. नीरवचा अमेरिकास्थित व्यावसायिक भागीदार मिहीर भन्साळी याचाही समन्स बजावण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. नीरवचे व्यवसाय आणि आर्थिक व्यवहार त्यांच्याशी जोडले गेलेले असल्याने त्यांची चौकशी आवश्यक असल्याचे ईडीने म्हटले आहे. समन्स बजावण्यात आलेले पाचही जण परदेशांत राहतात. त्यामुळे त्यांना ई-मेलच्या माध्यमातून समन्स बजावण्यात आले.
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्टच्या (पीएमएलए) अंतर्गत ही प्रक्रिया करण्यात आली. दीपक मोदी बेल्जियममध्ये, मेहता दाम्पत्य हॉंगकॉंगमध्ये तर निशाल आणि भन्साळी अमेरिकेत असल्याचा अंदाज आहे. याआधी ईडीने नीरव आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांना समन्स बजावले होते. मात्र, व्यावसायिक कामे आणि पासपोर्ट स्थगितीची कारणे देत त्यांनी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे टाळले.