नीट उमेदवारांचा डाटा लिक – राहूल गांधी

- राहूल गांधी यांनी केली चौकशीची मागणी
नवी दिल्ली – यंदाच्या नीट परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती बाहेर फुटल्याच्या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सीबीएसई मंडळाच्या अध्यक्षांना पाठवले आहे. अनिता कारवाल यांना पाठवलेल्या पत्रात राहुल गांधी यांनी म्हटले आहे की भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची माहिती अन्यत्र कोठेही लिक होणार नाही याची विशेष काळजी घेतली जावी.
काही माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार नीट परिक्षेला बसलेल्या दोन लाख विद्यार्थ्यांची नावे त्यांचे पत्ते, फोन क्रमांक आणि इमेल आयडी अशी सारी माहिती फुटली आहे. ही माहिती आता काही ऑनलाईन पोर्टल्सवरून पैसे देऊन विकली जात असल्याचेही या बातमीत म्हटले आहे. हे वाचून आपल्याला धक्का बसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
या माहितीच्या सुरक्षेची कोणतीही काळजी बोर्डाकडून गेण्यात आली नव्हती ही गंभीर बाब आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाकडे अशा स्वरूपाच्या परिक्षा घेण्याची क्षमता आहे की नाही याचीच आता शंका निर्माण झाली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.