breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
निसर्ग संवर्धनासाठी समूहभान जबाबदारी निर्माण करावी – डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख

पिंपरी – पर्यावरणाचा लढा हा मानवी न्यायाचा, समाजहिताचा आणि शाश्वत विकासाचा आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पातळीवर व्यापक विचार सुरू असून, या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी निसर्ग संवर्धनासाठी समूहभान निर्माण करण्याची जबाबदारी पेलावी. त्यामुळे नदी वाचवू शकते, असे मत माजी सनदी अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
चिंचवड येथील जिजाऊ उद्यानात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पर्यावरण अभियांत्रिकी विभाग यांच्या वतीने पर्यावरणपूरक प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका करुणा चिंचवडे, अपर्णा डोके, नगरसेवक राजेंद्र गावडे, नामदेव ढाके, स्विकृत सदस्य विठ्ठल भोईर आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, आज आपण पर्यावरणाचा अभ्यास तीन भागात करत आहोत. पर्यावरण विज्ञान, पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण तंत्रज्ञान पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे आदी गोष्टी केल्या तर नक्कीच पर्यावरणपूरक प्रत्येक प्रभाग होऊ शकतो. विकासाचे ढोल वाजविणारेच निसर्गाचे प्रदूषण करत आहेत. नदी म्हणजे केवळ वाहत्या पाण्याचा प्रवाह नाही. नदी ही एक जिवंत व्यक्ती आहे. नदीकाठी संस्कृती वसलेली आहे. नदी इकॉलॉजीचे (परिसंस्था) नैसर्गिक चक्र विणलेले आहे. मात्र, त्या इकॉलॉजीवर अतिक्रमण होत असल्याने नद्यांच्या अस्तित्वाचा आणि प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मानवी वस्ती, पशुपक्षी, झाडवेलीपासून कीटक जंतूंपर्यंतच्या नैसर्गिक परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करणे म्हणजेच नदी वाचविणे होय, नदी वाचली तर समाज संस्कृती वाचेल.
या प्रदर्शनांमध्ये पर्यावरणक प्रदर्शन भरविण्यात आले होते. विविध सामाजिक संस्था या प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या. आंघोळीची गोळी, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, खिळेमुक्त झाडे आदी सामाजिक संस्थांचा सहभाग होता.