निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीच; ते दयेच्या लायक नाहीत: SC

नवी दिल्ली: संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्लीतील २०१२ सालच्या निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल आज सुप्रीम कोर्टानं दिला आहे. दोषींनी केलेलं क्रूर कृत्य, त्याचे सबळ पुरावे आणि तमाम देशवासीयांच्या तीव्र भावना या आधारे न्यायमूर्तींनी, ‘निर्भया’च्या गुन्हेगारांना जराही दयामाया दाखवली नाही. त्यामुळे आता अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश यांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झालं आहे.
‘निर्भया बलात्कार प्रकरण हा दुर्मिळातील दुर्मिळ खटला आहे. तिला न्याय मिळावा यासाठी दोषींना कठोर शिक्षा देण्यास आम्ही बांधिल आहोत. दोषींनी केलेलं कृत्य अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारं आहे. ते दयेच्या लायक नाहीत’, असंही निक्षून सांगत सुप्रीम कोर्टानं चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली, तेव्हा भरगच्च कोर्टात टाळ्यांचा कडकडाट झाला.
१६ डिसेंबर २०१२ रोजी एका अल्पवयीन आरोपीसह सहा जणांनी चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. २०१३ मध्ये ट्रायल कोर्टानं त्यांना दोषी ठरवलं होतं आणि फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु, त्यांच्यापैकी एकानं – राम सिंहनं तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती. त्यामुळे उर्वरित चौघांची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयानं मार्च २०१४ मध्ये कायम ठेवली होती. या निर्णयाला दोषींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. परंतु, सुप्रीम कोर्टानंही फाशीचाच फैसला कायम ठेवला आहे.