“निपाह’ उपचारासाठी नायडू रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड

- पुणे शहर, परिसरातही संशयित रुग्ण अजून नाही
साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारी
पुणे – केरळमध्ये “निपाह’ रोगाने भीती निर्माण केली आहे. गोव्यामध्येही “निपाह’चा रोगी आढळला आहे. त्यामुळे आधीच काळजी घेण्याच्या दृष्टीने महापालिकेतर्फे नायडू रुग्णालयात यासाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात येणार आहे. तशा सूचना आरोग्य विभागाला दिल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी गुरूवारी दिली.
खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने शहरामध्ये “निपाह’ या संसर्गजन्य रोगावर उपचार करण्यासाठी ससून रुग्णालयामध्ये वार्ड तयार करावा, अशी मागणी केली होती. परंतु ससून रुग्णालयामध्ये असा वॉर्ड तयार केल्यास अन्य रुग्णांमध्ये घबराट पसरेल, असे उत्तर ससून रुग्णालयाकडून देण्यात आल्याचे उगले म्हणाल्या.
महापालिकेचे नायडू रुग्णालय हे खास संसर्गजन्य रोगांवर उपचार करण्यासाठीच आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून याच ठिकाणी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यामध्ये “निपाह’चा अद्याप रुग्ण सापडलेला नाही. पुणे शहर आणि परिसरातही संशयित रुग्णही आढळला नाही. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून ही सोय करण्यात आल्याचे उगले म्हणाल्या. याशिवाय पावसाळ्यामध्ये येणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर औषधांच्या पुरेसा साठा महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध करण्यात आल्याचे उगले म्हणाल्या.
पावसाळ्यात कुत्रे चावण्याचे प्रमाणही अधिक असते त्यामुळे ऍन्टी रेबीज लसही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले असून, विविध ऋतूंमध्ये होणारे आजार याचे एक कॅलेंडरच तयार करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्याचे उगले यांनी सांगितले.