निपाहबाबत आरोग्य प्रशासन गाफिल?

- गोव्यात संशयित आढळल्याची आरोग्य प्रशासनाला माहितीच नाही
पुणे – सध्या देशात निपाहची दहशत सर्वत्र पसरली आहे. गोव्यात एक संशयित रुग्ण आढळल्याचेही पीटीआयचे वृत्त आहे, मात्र तरीही आरोग्य विभागाचे अधिकारी मात्र असा कोणता रुग्ण आढळलाच नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे निपाहबाबत खरच आपण जागृत आहोत का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
आमच्यापर्यंत अजुनपर्यंत कोणताही संशयित किंवा रुग्ण आढळल्याचे वृत्त आलेले नाही. तसेच आम्ही सर्व विभागांना सूचना दिल्या असून ज्या ठिकाणी केरळवरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे, अशा ठिकाणी खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. मात्र सरसकट केरळमधून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात नाही.
– एम.एस.डिग्गीकर, सहसंचालक, राज्य आरोग्य विभाग
केरळमध्ये निपाह या व्हायरसमुळे जवळपास पंधरा जणांचा बळी गेला असतानाही महाराष्ट्रात याबाबत पुरेशी जागरुगता असल्याचे दिसून येत नाही. याबाबत नागरिकांनी लक्षणे आढळल्यास काय करावे व करू नये याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. मात्र बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी मात्र होताना दिसत नाही.
सोमवारी गोव्यात निपाहचा रुग्ण आढळल्याचे वृत्त पीटीआयने देताच याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. एम. एस. डिग्गीकर यांच्याशी दैनिक “प्रभात’तर्फे संवाद साधण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, अजुनपर्यंत तरी आमच्यापर्यंत अशा प्रकारे संशयित आढळल्याचे वृत्त नाही. दरम्यान आम्ही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्व पर्यटक येणाऱ्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान निपाहची लक्षणे आढळून आल्यास त्यांनी तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. तसेच याबाबत आरोग्य विभागाचे राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदिप आवटे यांनी सांगितले, अशा प्रकारे रुग्ण आढळल्याची आमच्याकडे अद्याप माहिती आलेली नाही.