निपाहच्या भितीने फळांची मागणी घटली

पिंपरी – निपाह (एनआयव्ही) विषाणूमुळे मनुष्य आणि प्राणी या दोघांमध्ये गंभीर स्वरुपाचे आजार निर्माण होऊ शकतात. वटवाघुळे ही या विषाणूची नैसर्गिक वाहक असल्याचा प्रचार आणि प्रसार हा सोशल मीडियासह सर्वच प्रसारमाध्यमांतून झाला. त्यामुळे फळांविषयी माणसांच्या मनात भितीचे वातावरण पसरल्याने आहे. तेव्हापासून निपाहच्या भितीने फळांची मागणी घटली आहे. सध्या अधिकमास आणि रमजान सुरू असूनही फळांच्या खरेदीकडे ग्राहकांनी कानाडोळा केला आहे.
केरळमधील कोझीकोड भागात निपाह विषाणूची साथ तेजीत पसरत असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तासांमध्ये देशभर पसरली. निपाहावर कोणतीही लस किंवा औषध नाही. या विषाणूचे वाहक म्हणून वटवाघूळ असल्याने तसेच ते फळे खात असल्याने त्यांनी खाल्लेल्या अर्धवट फळांच्या माध्यमातून हा विषाणू पसरतो. अशा माहितीमुळे बहुतांशी ग्राहक सध्या कोणतीच फळे खरेदी करण्यासाठी सध्या धजावत नाही. सध्या आंब्यांचा हंगाम सुरू आहे. आंबा हा दक्षिण भागातूनच येत असल्याने आणि याच भागात निपाहचे रुग्ण आढळल्याने ही भीती आणखी वाढलेली आहे.
मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे. रमजानमध्ये फळांना प्रचंड मागणी असते. नेहमीच्या तुलनेत ही मागणी केवळ २५ टक्केच होत असल्याचे पेठरोड बाजार समितीच्या आवारातील घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत देवगड, रत्नागिरी, मद्रास आदी भागातून येणारे कच्चे आंबे पिकविण्याची प्रक्रिया सध्या मंदावली आहे. आंब्याची मागणी कमी असल्यामुळे थोड्याच प्रमाणात आंबे पिकविली जात आहे. सफरचंद, चिक्कू, खरबूज, पेरू, केळी, जांभूळ आदी फळांचीही विक्री थंडावली आहे. ग्राहक नसल्याने फळांचे दरही काही प्रमाणात घसरल्याचे दिसून येत आहे.