‘नितीन गडकरी आणि संघाकडून मोदींच्या हत्येचा कट’

दिल्ली – माओवाद्यांकडून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती शुक्रवारीच पुणे पोलिसांनी दिली होती. याच क्रमवारीत आता जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा शेहला रशीद यांच्या एका ट्विटमुळे नवा वाद सुरू झाला आहे. शेहला या त्यांच्या ट्विटमुळे चांगल्याच अडचणीत येण्याची शक्यता आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचत आहेत. नंतर या हत्येचा आरोप मुस्लिम आणि कम्युनिस्टांवर करतील आणि मुस्लिमांच्या हत्या घडवून आणतील,’ असं ट्विट शेहला यांनी केलं होतं. या ट्विटमध्ये शेहला यांनी #RajivGandhiStyle या हॅशटॅगचाही वापर केला.
शेहला यांचं ट्विट काही क्षणातच व्हायरल झालं, आणि त्यावर नितीन गडकरी यांनी जोरदार आक्षेप घेत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. ‘ज्यांनी माझ्यावर मोदींच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. अशा समाजकंटकांविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे,’ असं ट्विट गडकरी यांनी केलं. गडकरींनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर शेहला यांनी आणखी एक ट्विट करुन ते ट्विट उपाहासाचा एक भाग होता, असं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला केवळ एका उपहासात्मक ट्विटमुळे इतका राग येतो. मग, उमर खालिदसारख्या निष्पाप विद्यार्थ्यांविरोधात टाइम्स नाऊ सारख्या माध्यमाला धरुन मोहीम चालवण्यात आली, त्यावेळी त्याच्या आई-वडिलांना काय वाटलं असेल याचा विचार करा’ असं ट्विट शेहलाने केलं आहे.
जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे आरोप केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना किती त्रास होत असेल हे सांगण्याचा त्या ट्विटमागचा उद्देश होता असं शेहलाने एका चॅनलसोबत बोलताना म्हटलं आहे. मोदी सरकारच्या अपयशावरुन लक्ष हटवण्यासाठी पोलिसांकडून मोदींच्या हत्येच्या कटाचं वृत्त पेरण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. शुक्रवारी पुणे पोलिसांनी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात ५ जणांना अटक करुन न्यायालयात हजर केलं होतं. त्यावेळी दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या एकाच्या घरातून मोदींच्या हत्येच्या कटाचा पुरावा मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.