breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडीतील मुख्यमंत्र्यांची सभा ऐतिहासिक ठरणार; पालकमंत्री बापट यांचा दावा

  • मैदानावरील सभेच्या नियोजनाची केली पाहणी
  • पत्रकार परिषदेत बापट यांनी दिली माहिती

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मदनलाल धिंग्रा मैदान आजवर दुरवस्थेत आणि दुर्लक्षीत राहिले. त्याला आम्हीच जबाबदार असल्याची कबुली देत भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी सभेच्या निमित्ताने मैदानाची दुरूस्ती केली असून यापुढे मैदान वापरात येईल, अशी माहिती दिली. तर, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील बारा तालुक्यातून पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजेरी लावणार आहेत. सभेची संपूर्ण तयारी धिंग्रा मैदानावर केली असून ही सभा ऐतिहासिक सभा ठरणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी (दि. 30) पत्रकार परिषदेत सांगितली.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि. 3) फोडण्यात येणार आहे. त्यासाठी निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर सभेचे आयोजन केले आहे. सभेची तयारी करण्याचे नियोजन पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांनी मैदानाची आज प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सभेची सविस्तर माहिती दिली.

बापट म्हणाले की, पाच एकरची जागा असलेल्या मदनलाल धिंग्रा मैदानावरील मुख्यमंत्र्यांच्या सभेचे नियोजन पूर्ण झाले आहे. बसण्याची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील बारा तालुक्यातून पक्षाचे कार्यकर्ते सभेला येणार आहेत. 65 हजारहून अधिक लोकांची हजेरी लागणार आहे. वाहन तळाची व्यवस्था केली आहे. मैदानावर स्क्रीन लावण्यात येणार आहेत. मैदानाबाहेर स्क्रिन्स लावल्या जाणार आहेत. बाहेरील बाजुवर बसून कार्यकर्त्यांना सभा पाहता येईल, अशी व्यवस्था आहे. ही सभा ऐतिहासिक सभा ठरणार आहे. या सभेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे बळ मिळणार आहे, असेही पालकमंत्री बापट म्हणाले.

यावेळी आमदार महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नेते आझम पानसरे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी, सरचिटणीस अमोल थोरात, प्रदेश कार्यकारीणी सदस्य उमा खापरे, नगरसेवक नामदेव ढाके, शितल शिंदे, कार्यकर्ते अमित गोरखे, अनुप मोरे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड आदी उपस्थित होते.

तक्रारदार काळभोर पक्षाचा कार्यकर्ता नाही – जगताप

धिंग्रा मैदावरील भाजपच्या सभेविरोधात आपले सरकारवर तक्रार केल्यासंदर्भात विचारले असता शहराध्यक्ष आमदार जगताप म्हणाले की, तक्रार करणारा सचिन काळभोर हा भाजपचा कार्यकर्ता नाही. धिंग्रा मैदानावर सभा घेण्यासाठी आयुक्त श्रावण हार्डीकर यांची रितसर परवानगी घेतली आहे. त्याचे शूल्क पक्षाने भरले आहेत. जर, सभा घेण्यास निर्बंध येत असले असते तर आयुक्तांनी सभेला परवानगी दिली नसती, असेही जगताप म्हणाले.

राष्ट्रवादीच्या सभेऐवजी भाजपच्याच सभेला उपस्थित राहणार – बापट

मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची एकाच दिवशी एकाच वेळी परंतु, वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहेत. पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी या सभेच्या निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्री गिरीश बापट हे देखील उपस्थित राहणार असल्याचे नमूद केले आहे. पालकमंत्री बापट मुख्यमंत्र्यांची सभा सोडून राष्ट्रवादीच्या सभेला कसे काय उपस्थित राहणार, असा प्रश्न उपस्थित झाल्याने याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी प्रथम प्राधान्य हे भाजपच्याच सभेला देणार असल्याचे सांगितले.

 

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button