नासाची आता थेट सुर्यावरच मोहीम

- 6 ऑगस्टला होणार यानाचे प्रक्षेपण
वॉशिंग्टन – नासा या अमेरिकन अंतरीक्ष संशोधन केंद्राने आता थेट सुर्यावरच मोहीम आखली आहे. येत्या 6 ऑगस्ट रोजी नासाचे यान सुर्याच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. मानवी इतिहासातील ही पहिलीच मोहीम असणार आहे. यापुर्वी कोणतेही मानवनिर्मीत यान सुर्याच्या जितक्या जवळ गेले नव्हते तितक्या जवळ जाऊन या यानातून सुर्याच्या पार्श्वभूमीचा अभ्यास केला जाणार आहे.
नासाचे या मोहीमेतील एक वैज्ञानिक ऍलेक्स यंग यांनी सांगितले की गेले अनेक दशके आम्ही सुर्याचा अभ्यास करतो आहोत. आणि आता आम्ही अंतिमत: त्या दिशेने प्रस्थान करीत आहोत. सुर्य हा एकंदरीतच गुंतागुंतीचा विषय आहे. मानवी डोळ्यांच्या क्षमतेच्या बाहेरचा हा अविष्कार आहे. डायनामिक आणि मॅग्नेटिकली ऍक्टिव्ह स्टार असे त्याचे वर्णन करता येईल असे ते म्हणाले. सुर्याकडून मॅग्नेटिक कॉईलच्या स्वरूपात उर्जा बाहेर फेकली जाते आणि अंतरिक्षात त्याचा स्फोट होऊन त्याचे प्रकाश, उष्णता, उर्जा आणि पार्टीकल रॅडिएशनच्या स्वरूपात रूपांतर होते.
सुर्याचा पृष्ठ भाग हा पृथ्वीपासून चार दशलक्ष मैल दूर आहे. त्याच्यातून जितकी उष्णता आणि किरणोत्सर्ग बाहेर फेकला जातो तितका अन्य कोणत्याही ग्रहापासून फेकला जात नाही. त्यामुळे सुर्याच्या जवळ जाणे ही आजवर अशक्यप्राय गोष्ट मानली जात होंती. पण अलिकडच्या काळात उष्णतेपासून बचाव करणारे शिल्ड, सोलर ऍरे कुलिंग सिस्टीम आणि फॉल्ट मॅनेजमेंट सिस्टीम विकसित झाल्यामुळे सुर्यावर मोहीम काढण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे अशी माहिती नासाच्या तंत्रज्ञांनी दिली.