नागरिकांचे आरोग्य धोक्यात; पालिकेच्या मुख्य इमारतीतच होतोय दुषीत पाणी पुरवठा

- दोषी अधिका-यांवर कारवाई करण्याची दत्ता साने यांची मागणी
पिंपरी – महापालिका भवनाच्या छतावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये दुषीत पाणी आढळून आल्याने पाणी पुरवठा विभाग, स्थापत्य विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिका-यांची पाचावर धारण बसली आहे. दुषीत पाणी पुरवठा होत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यास जबाबदार असलेल्या अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सोमवारी (दि. 4) केली.
महापालिका भवनात पाणी पुरवठा करण्यासाठी छतावर दोन टाक्या बांधल्या आहेत. मात्र, या टाक्या कित्येक दिवसांपासून अस्वच्छ अवस्थेत आहेत. त्यामुळे पालिका भवनातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, राजकीय पदाधिकारी तसेच, नागरिकांना अस्वच्छ पाणी दिले जाते. दोन दिवसांपूर्वी पाणी पीत असताना विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना दुषीत पाणी असल्याचे कळताच त्यांनी तातडीने आपल्या सहका-यांना घेऊन पालिकेच्या छतावर जाऊन टाक्यांची पाहणी केली. त्यावर टाक्यांमधील दुषीत पाणी निदर्शनास येताच त्यांनी स्थापत्य विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिका-यांना याचा जाब विचारला. त्यावर तिन्ही विभागांच्या अधिका-यांनी टोलवाटोलव केली.
दत्ता साने म्हणाले की, दोन्ही टाक्यांमध्ये साठलेल्या पाण्याची दुर्गंधी येत होती. त्यामुळे ते पाणी संकलीत करून परिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. पाण्यातील पंप गंजलेले आहेत. टाक्या शेवळलेल्या आहेत. दोन महिन्यानंतर दोन्ही टाक्या साफ केल्या जात असल्याचा खुलासा स्थापत्य विभागाने केला आहे. परंतु, सात ते आठ महिने झाले असतील टाक्या साफ केल्या नाहीत, असा आरोप साने यांनी केला आहे. पालिकेत सामान्य नागरिक येतात. अधिकारी, पदाधिकारी असतात. त्यांना दुषीत पाणी पाजले जात आहे. त्यामुळे या पाण्याचे परिक्षण करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.
चिखली येथील सोसायट्यांध्ये राहणा-या नागरिकांना देखील पाणी पुरवठा विभागाकडून दुषीत पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी प्लास्टीक बाटल्यांमध्ये दुषीत पाणी घेऊन साने यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यशवंत कॉलनी, मनिषा कॉलनीमध्ये दुषीत पाणी पुरवठा केला जात आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना हे दुषीत पाणी दाखवून संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्यासाठी सूचना करणार आहे, असे साने यांनी सांगितले.