breaking-newsपुणेमहाराष्ट्र

नव्या वेळापत्रकानुसार शहरात रात्री-अपरात्री केव्हाही पाणीपुरवठा

आजपासून पाणीपुरवठय़ाचे नवे वेळापत्रक

शहरातील सर्व भागाला पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज पाच तास पाणीपुरवठय़ाचे नियोजन महापालिकेने केले आहे. या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी सोमवारपासून (२९ ऑक्टोबर) होणार असून, त्यानुसार काही भागात रात्री-अपरात्री केव्हाही पाणीपुरवठा होणार आहे. पालिकेला पुरेसे पाणी उपलब्ध होत असतानाही विस्कळीत पाणीपुरवठा, पाणी वितरणाची सदोष यंत्रणा आणि नव्या वेळापत्रकाच्या चाचणीवेळी पुढे आलेल्या तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर नव्या वेळापत्रकानुसार तरी शहरात नियमित पाणीपुरवठा होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणामध्ये गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरासाठी प्रतीदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी घेण्याऐवजी ११५० दशलक्ष लिटर पाणी घ्यावे, अशी सूचना महापालिकेला करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाकडून कमी पाणी मिळणार असतानाही पर्वती ते लष्कर जलकेंद्रादरम्यानच्या नव्या बंद जलवाहिनीतून प्रतीदिन १५० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे  पाणीपुरवठय़ावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रशासनाकडून नव्या वेळापत्रकाचे नियोजनात करण्यात आला होता.

नव्या वेळापत्रकाची अंलमबजावणी म्हणजे पाणीकपात नाही. पाणीपुरवठय़ाच्या तक्रारींचे प्रमाण वाढल्यामुळे प्रत्येक भागाला पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक भागाला पाच तास पाणीपुरवठा होईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी जाहीर केले होते. नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करताना विभाग बदलण्यात आले आहेत. यापूर्वी जुन्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करताना पाण्यासंदर्भात असंख्य तक्रारी येत होत्या.

जलसंपदा विभागाकडून पुरेसे पाणी मिळत असतानाही सदोष यंत्रणेमुळे सर्व भागाला नियमित पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाला अपयश आले होते. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून नव्या वेळापत्रकाची चाचणी प्रशासनाकडून घेण्यात आली. कोथरूड, कर्वेनगर, औंध, बाणेर, पाषाण, सिंहगड रस्ता, सहकानगर, पद्मावती, पर्वती, शहराचा मध्यवर्ती भागातील पेठासह उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे नव्या वेळापत्रकाच्या अंमलबजावणी बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. सोमवारपासून काही भागाला रात्री, मध्यरात्री तसेच पहाटेही पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.

गळती रोखून मिळणारे पाणीही नियोजनात

पर्वती ते लष्कर जलकेंद्रा दरम्यानच्या बंद जलवाहिनीचे काम येत्या पंधरा नोव्हेंबपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रतिदिन १०० ते १५० दशलक्ष लिटर पाण्याची गळती रोखली जाऊन हे पाणी वापरता येणार आहे. पाण्याच्या सुधारित वेळापत्रकाच्या नियोजनात ही बाब गृहीत धरण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत महापालिकेला प्रतीदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. त्यानंतर ११५० दशलक्ष लिटर आणि गळतीतून वाचणारे १५० दशलक्ष लीटर पाणी असे प्रतीदिन एकूण १३५० दशलक्ष लिटर पाणी महापालिकेला उपलब्ध होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button