नवऱ्याचा पगार जाणून घेण्याचा बायकोला अधिकार- न्यायालय

जबलपूर : बायकोला नवऱ्याचे वेतन जाणून घेण्याचा संपूर्ण अधिकार असल्याचे निरीक्षण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने वर्तवले आहे. सुनिता जैन या महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
सुनिता आणि त्यांचे पती पवनकुमार जैन यांचा घटस्फोट झाला असून त्यांना पतीकडून खर्चासाठी महिन्याला केवळ सात हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवावी, अशी मागणी सुनिता यांनी केली होती. माझे पती बीएसएनएलमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यांना भरपूर पगार मिळतो, असेही सुनिता यांनी म्हटले होते. मात्र पवनकुमार यांनी आपल्या पगाराची पावती न्यायालयात जमा केल्यानंतर न्यायालयाने सुनिता यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर सुनिता यांनी माहितीच्या अधिकारात पवनकुमार यांच्या पगाराचा तपशिल मागितला. त्याला पवनकुमार यांनी मार्च २०१५ मध्ये उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठासमोर आव्हान दिले. त्यावेळी न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.