नर्मदेच्या पाण्याने मला स्नान घाला ; इच्छा लिहून जीवनयात्रा संपवली

पिंपरी – नर्मदेच्या पाण्याने मला अखेरचे स्नान घाला. नर्मदेच्या तीरावर असलेल्या मंडलेश्वर येथे माझ्यावर अंत्यसंस्कार करा, असे सुसाईडनोटमध्ये लिहून एकाने इमारतीच्या गच्चीला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना चिंचवड येथे सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. जतीन धनंजय जहागीरदार (वय ३४, रा. चिंचवडगाव) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जतीन यांनी चिंचवडगाव येथील राहत्या घराच्या गच्छीवरील कठड्याला दोरी बांधून इमारतीवरून उडी मारली. यामध्ये गळफास बसून त्यांचा मृत्यू झाला. इमारतीबाहेर नागरिकांना मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. परिसरातील नागरिकांनी अग्निशामक दलास याबाबत माहिती दिली. तसेच पोलिसांनाही कळविले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यावेळी तेथे एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत माझ्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये. कुटुंबातील सर्वांनी एकमेकांशी जुळवून घ्यावे. माझ्या दुचाकीची कोणाला विक्री करू नका, अशी शेवटची इच्छा असल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे. आत्महत्येचे नेमके कारण काय हे स्पष्ट झालेले नाही. चिंचवड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.