नटसम्राट निळू फुले नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात

पिंपरी: कामगारनगरी म्हणून ओळख असणा-या पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक वारसा जपणे त्याचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी पिंपळे-गुरवमध्ये सुसज्ज असे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह उभारण्यात येत आहे. या नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
शहरात महापालिकेच्या वतीने चिंचवडमध्ये प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकाराम नगरमध्ये आचार्य अत्रे नाट्यगृह तर भोसरीत अंकुशराव लांडगे नाट्यगृह बांधण्यात आली आहेत. पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी परिसरामधील नागरीकांना त्यांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी इतर भागात जावे लागत होते. ही गरज ओळखून महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथील आरक्षण क्र. 345 च्या सुमारे 3502 चौ. मी. क्षेत्रावर भव्यदिव्य असे नाटयगृह उभारण्यात आले आहे. याचे काम 90 टक्के पुर्ण झाले असून विद्युत विषयक व साऊंड सिस्टिमचे काम बाकी आहे.
महापालिकेने सुमारे 35 कोटी रूपये खर्च करत शहरातील सर्वाधिक भव्यदिव्य असे हे नाट्यगृह उभारले आहे. या नाट्यगृहाचे उद्घाटन येत्या काही दिवसात होणार आहे. नाट्यगृहाचे आर्किटेक्ट मिलिंद किरदत तर ठेकेदार बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेन्क्रो. प्रा. लि. यांनी हे काम केले आहे, अशी माहिती बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता राजन पाटील यांनी दिली.
नाट्यगृहाची वैशिष्टे
# आसन क्षमता बाल्कनीसह 613
# दुचाकी 312 व चारचाकी 78 अशी तळमजल्यावर पार्किंगची सोय
# पहिल्या मजल्यावर 210 चौ.मी. क्षेत्राचे बहुउद्देशीय सभागृह
# सभागृहासाठी स्वतंत्र जीना
# लहान कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देणे शक्य
# स्वतंत्र मोठ्या हॉलची व्यवस्था करणेत आलेली आहे.
# 35 कोटींचा खर्च