भाजपच्या नगरसेविका कमल घोलप दहावी परिक्षा उत्तीर्ण

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 च्या भाजप नगरसेविका व ‘फ’ क्षेत्रीय कार्यलयाच्या अध्यक्षा कमल घोलप या प्रथम श्रेणीत दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशाबद्दल त्यांचे प्रभागातील नागरिक आणि महापालिकेतील अधिकारी वर्गातून कौतुक होत आहे.
इयत्ता दहावी शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 8) जाहीर झाला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका घोलप यांनी सुध्दा एसएससी बोर्डाची परीक्षा दिली होती. त्यांनी दहावीच्या परीक्षेत 72 टक्के गुण मिळवून विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर आदर्श निर्माण केला आहे.
शाळा सोडल्यानंतर तब्बल 21 वर्षांनी नगरसेविका कमल घोलप या दहावीची परीक्षा उर्तीण झाल्या आहेत. वयाच्या 39 वर्षात वाटचाल होत असताना देखील त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. सध्या त्या दोन मुलांच्या आई आहेत. घोलप या प्रभाग क्रमांक 13 च्या नगरसेविका असून त्या “फ” क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.