breaking-newsपिंपरी / चिंचवड

नगरसेवक करणार वृक्षारोपणाचे “क्रॉस चेकींग’

  • वृक्ष संवर्धन समितीचा निर्णय : 60 हजार वृक्षारोपणाचा मानस

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला “हरित शहर’ करण्यासाठी शहरात यंदा 60 हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी वृक्षारोपण होणाऱ्या ठिकाणी स्थानिक प्रभागातील दोन नगरसेवकांच्या पाहणीनंतर त्यांच्या स्वाक्षरीने याची पडताळणी केली जाणार आहे.

महापालिकेच्या वृक्षसंवर्धन समितीची बैठक शुक्रवारी (दि.18) स्थायी समिती सभागृहात अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला सदस्य भाऊसाहेब भोईर, शाम लांडे, शितल शिंदे, विलास मडिगेरी, नवनाथ जगताप, साधना मळेकर, संभाजी बारणे, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके आदी उपस्थित होते.

शहरातील विविध सोसायट्यांमधील वृक्षांची छाटणी अथवा अडचण ठरत असलेले वृक्ष काढून टाकण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केले जातात. केवळ वृक्ष छाटणीकरिता या समितीचे अस्तित्व नसल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना खडसावत, शहरातील वृक्षांची संख्या कमी करण्याऐवजी ती कशाप्रकारे वाढेल, यावर भर देण्याची गरज सदस्य भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केली. शहराच्या पर्यावरणाचा नवा आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. याअंतर्गत शहरात यंदा 60 हजार झाडे लावली जाणार आहे.

दरम्यान, शहरात दरवर्षी वृक्षारोपण केले जात असले, तरी देखील त्यांच्यावर देखरेख, पाहणी करुन यापैकी किती झाडे जगली याची माहिती समितीसमोर येत नाही. तसेच दरवर्षी नेमके होणारे वृक्षारोपण होते की नाही याची पडताळणी करण्याची यंत्रणा देखील महापालिका प्रशासनाकडे अस्तित्वात नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी स्थानिक प्रभागातील नगरसेवक प्रत्यक्ष भेट देऊन, या वृक्षारोपणाची पडताळणी करतील. त्यांची शहानिशा झाल्यानंतर ते या वृक्षारोपणाच्या संख्येच्या माहितीवर स्वाक्षरी करतील. हा अहवाल ग्राह्य धरला जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

दरम्यान, वृक्षारोपणाकडे नागरिकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार 28 मे रोजी सायंकाळी चार वाजता ऑटो क्‍लस्टर येथे शहरातील पर्यावरण प्रेमी, वृक्ष प्रेमी, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या सर्व पर्यावरण प्रेमींना ओळखपत्र देऊन, त्यांच्याकडे शहराच्या विविध भागांमधील वृक्ष संवर्धनाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

पुण्याच्या धर्तीवर “वर्षा मॅरेथॉन’ उपक्रम
पुणे महापालिकेच्या वतीने वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या वर्षा मॅरेथॉन धर्तीवर हा उपक्रम पिंपरी-चिंचवड शहरातही राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात अधिकाधिक तरुण व नागरिक सहभागी होऊ शकतील, याकरिता प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. त्याकरिता प्रभागातील स्थानिक नगरसेवकांनी या स्वयंसेवकांना टी-शर्ट वाटपाची जबाबदारी घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच शहरात लावल्या जाणाऱ्या रोपांमध्ये देशी रोपांचा समावेश असेल याबाबतचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button