नगरसेवकाने पालिकेच्या अधिकाऱ्याला फासले काळे

पिंपरी – अनियमित व अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे विविध भागातील नागरिक हैराण झाले आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी टंचाई असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दत्तवाडी, विठठलवाडी, श्रीकृष्ण नगर, ओटो स्कीम, मोहननगर, काळभोरनगर या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत महापालिकेत बैठकही झाली. मात्र, पाणीप्रश्न सुटलेला नाही. या नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त नागरिकांसह नगरसेवक जावेद शेख यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला काळे फासले.
गुरुवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास आकुर्डीत मोठ्या प्रमाणावर नागरिक जमले होते. त्यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सुशिलकुमार लवटे आणि अन्य सहकारी उपस्थित होते. त्यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. आमच्याच भागात पाणी प्रश्न का? असा प्रश्नही उपस्थित केला. त्यावेळी अण्णा कुऱ्हाडे ,सय्यद इखलास, प्रकाश परदेशी, तोहित शेख, वसंत सोनार, हरिभाऊ हांडे, बयाजी तोरणे आदी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. महिलाही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. त्यावेळी अधिकाऱ्यांनी तुमच्या परिसरातला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आणखी कालखंड लागेल असे सांगितले. कितीतरी दिवसांपासून हा प्रश्न जर प्रलंबित आहे. तो सोडविण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करत तुमच्याकडून दरवेळी उडवाउडवीची कसे दिली जात असल्याचे सांगत अधिकाऱ्याला नगरसेवक शेख यांनी काळे फासले.
याबाबत शेख म्हणाले, दत्तवाडी, विठठलवाडी, श्रीकृष्ण नगर, ओटो स्कीम, मोहननगर, काळभोरनगर या भागात गेल्या वर्षभरापासून पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, बैठका घेतल्या. मात्र, केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळाली. आठ दिवसात काम होईल, अजून दोन दिवस द्या, अशी आश्वासने अनेकदा दिली. मात्र, पुढे काहीच झाले नाही. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी वेळ मारून नेत आहेत. महापालिकेचा कर नियमित भरूनही पाणी मिळत नाही. हा अन्याय आहे. अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बैठका घेऊनही काहीही सुधारणा होत नव्हती. दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे नागरिकांचे पाणी हक्काचे आहे. हा मुलभूत अधिकार आहे. नाईलाज झाल्याने आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले. पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास यापुढे आंदोलन तीव्र केले जाईल. याची दखल महापालिकेने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी. या भागातील पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करावा.