ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
नगरसेवकांनी सभागृहाचे नियम पाळावेत – पालकमंत्री बापट

पिंपरी: विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांचे प्रश्न लोकशाही मार्गाने सभागृहात मांडले पाहिजेत. त्यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. मात्र, लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम सभागृहात करु नये, असे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या निलंबनाचे त्यांनी समर्थन केले.
पिंपरीत पत्रकारांशी ते बोलत होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत महापौर नितीन काळजे यांनी विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक दत्ता साने, मयुर कलाटे यांचे निलंबन केले आहे.
अनेक वर्ष मी विरोधी पक्षात काम केले आहे. आमच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने अनेकदा आंदोलन केले. पंरतु, असे करताना नियमांचे कधीच उल्लंघन केले नाही, असे सांगत बापट पुढे म्हणाले काँग्रेस-राष्ट्रवादी सारखे आम्ही वागत नाही. सगळ्यांना सभागृहात बोलून दिले जाते.
आपल्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी विरोधकांनी आंदोलन करावे. सभागृहातील हौदात धाव घ्यावी. परंतु, सभागृहाचा अवमान होईल, असे वर्तन करु नये. लोकशाहीला काळीमा फासणारे कृत्य केल्यास निलंबन करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीला जनतेने नाकारले आहे. महापालिकेत परिवर्तन झाले असून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्याचे भान ठेवले पाहिजे. त्यांनी विरोधक झाल्यासारखे काम करावे.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे निलंबन कायद्यानुसारच केले आहे. ज्यांना कायद्याचे उल्लंघन केल्याचे वाटत असेल त्यांनी न्यायालयात जावे, असेही बापट म्हणाले.