धक्कादायक! जुगारात पत्नीला लावलं पणाला, जिंकणाऱ्याने केला बलात्कार
नवी दिल्ली : महाभारता सारखा प्रकार ओडिशामध्ये घडल्याचं समोर आलं आहे. ओडिशाच्या बालासोर येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जुगारात पणाला लावलं आणि तो डावही तो हारला. त्यानंतर जिंकणाऱ्या व्यक्तीने पत्नीवर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे या दरम्यान पत्नीचा बचाव करण्याऐवजी तिचा पती बलात्काऱ्याची मदत करत होता, असा आरोप पीडितेने केला आहे.
पीडितेने पोलिस स्थानकात केलेल्या तक्रारीनुसार, २३ मे रोजी तिच्यासोबत बलात्कार झाला. आरोपीने पतीच्या सहमतीने बलात्कार केला. बलात्काराचा विरोध करत असताना पतीने माझी मदत करण्याऐवजी माझं तोंड दाबलं आणि मला बांधून ठेवलं, असा आरोप पीडितेने केला आहे. पीडिता दोन मुलांची आई आहे. पीडितेच्या पतीला जुगाराचं व्यसन असल्याचा दुजोरा गावकऱ्यांनी दिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाची चौकशी करणारे पोलीस अधिकारी के. एस. पढी यांनी सांगितले.