दौंड-पुणेदरम्यान नवी रेल्वे धावणार
पुणे : मध्य रेल्वेच्या वतीने दौंड ते पुणे स्थानकांदरम्यान नवी रेल्वे सोडण्यात येणार आहे. पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी ती दौंड स्थानकावरून पुण्याकरिता सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या आठवडाभरात ही नवी रेल्वे सुरू होणार असून डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) धावेल की पॅसेंजरचे रेक सोडण्यात येतील, याबाबत माहिती कळू शकली नाही. सद्यःस्थितीत पुण्याहून दौंड मार्गे उत्तर भारतात सुमारे पन्नास रेल्वे धावतात.
तर पुणे-दौंडदरम्यान डेमूच्या चार फेर्या व शटलच्या दोन फेर्या अशा दोन्ही बाजूंनी मिळून सहा फेर्या दररोज होतात. सकाळी 7.05 वाजता दौंडहून पुण्याकरिता पहिली गाडी धावते. मात्र त्याआधी गाडीच नसल्याने भल्या पहाटे पुण्यात नोकरी-धंद्यानिमित्त येणारे प्रवासी, दूध, फळ विक्रेते, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांची मोठी गैरसोय व्हायची. त्यांना रस्ते मार्गाने पुण्यात पोहोचावे लागायचे. अशांची आता मोठी सोय होणार आहे. ‘पहाटेची रेल्वे सुरू करण्यात यावी, याकरिता आम्ही सातत्याने पाठपुरावा केला असून त्याला अखेर यश मिळाले. पुणे विभागाचे आम्ही आभार मानतो’, असे दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी सांगितले.