दोन सराईत वाहनचोर जाळ्यात;तीन दुचाकी जप्त

दत्तवाडी पोलिसांनी दोन सराईत वाहनचोरांना जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी (24 मे) सायंकाळी करण्यात आली.
उमेश वसंग जंगम (वय-22, रा.जनता वसाहत) आणि तेजस उर्फ मॉन्टी माणिक खराडे (वय-20, रा.जनता वसाहत) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विकास कदम आणि सागर सुतकर यांना वरील आरोपी चोरीची दुचाकी विकण्यासाठी लक्ष्मीनारायण थिएटरजवळील पर्वती दर्शन येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते वापरत असलेली अॅक्टीव्हा दुचाकी त्यांनी जनता वसाहत येथून चोरल्याचे कबूल केले. त्यांना चोरीच्या गुन्ह्यात अटक करून अधिक चौकशी केली असता त्यांनी हिरो होन्डा कंपनीच्या आणखी दोन दुचाकी चोरल्याचे कबूल केले. आरोपीकडून एकूण 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर सिंहगड पोलीस ठाणे आणि वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.