Mahaenews

दोन लाख महिलांचा महिन्यात “तेजस्विनी’ प्रवास

Share On

पुणे – महिलांसाठी पीएमपीने सुरू केलेल्या तेजस्विनी बससेवेला प्रतिसाद वाढू लागला आहे. शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक महिन्यात नऊ मार्गांवर सुमारे दोन लाख महिलांनी या बससेवेचा लाभ घेतला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पीएमपी प्रशासनाने 8 मार्च रोजी तेजस्विनी बससेवा सुरू केली. तत्पूर्वी, शहरात चार मार्गांवरच विशिष्ट वेळेत ही बससेवा सुरू होती. आता नऊ मार्गांवर दर अर्ध्या तासाने ही बस उपलब्ध आहे. एक महिन्यात प्रतिदिन सुमारे 6 हजार 728 महिला प्रवासी या बससेवेचा वापर करीत आहेत. नियमित बसला 8-10 हजार प्रवासी उपलब्ध होतात. तुलनेत नवी बससेवा असूनही तेजस्विनी बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले. या सेवेतून एक महिन्यात सरासरी 85 हजार 910 रुपयांचे उत्पन्न पीएमपीला मिळाले आहे. प्रवासी महिलांचा प्रतिसाद असाच वाढता राहिला, तर नऊ मार्गांऐवजी अधिक मार्गांवर ही बससेवा सुरू करण्यात येईल. पीएमपीला उपलब्ध झालेल्या 100 मिडी बसपैकी 30 बस प्रवासी महिलांसाठी वापरल्या जात आहेत. या बससाठी तिकीट नेहमीचेच आहे, असेही प्रशासनाने सांगितले.

या मार्गांवर दर अर्ध्या तासाला बस – 
महापालिका- लोहगाव, महापालिका- भोसरी, कात्रज- कोथरूड, कोथरूड- कात्रज, कात्रज- शिवाजीनगर, कात्रज- महात्मा हौसिंग बोर्ड-येरवडा, हडपसर- वारजे माळवाडी. भेकराईनगर- मनपा, निगडी- हिंजवडी- माण, फेज 3.

Exit mobile version