दोन पदांचे वेतन लाटणा-या कर्मचा-याला मनपा, पोलिसांचे अभय

- श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालयाचे प्रकरण
- पोलीस आणि मनपा प्रशासनात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप
पिंपरी – महापालिकेतील शिक्षण मंडळ प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने चतुर्थ श्रेणीतील एका कर्मचा-याने चक्क शासनाला फसविले आहे. दोन वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असल्याचे दाखवून या कर्मचा-याने दोन्ही ठिकाणचा गलेलठ्ठ पगार खुलेआम लाटला आहे. तरीही, त्याच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे पोलीस आणि मनपा प्रशासन यांच्यात आर्थिक देवानघेवान झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण मंडळ प्रशासनाच्या अखत्यरित काळेवाडी, तापकीरनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालयात महेंद्र नामदेव बामगुडे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. तर, पुणे मनपाच्या प्रशासकीय सेवेत देखील ते कार्यरत आहेत. नियमानुसार एका कर्मचा-याला दोन संस्थांमध्ये काम करणे गुन्हा ठरतो. तरी देखील बामगुडे यांनी दोन्ही संस्थांमध्ये कार्यरत असल्याचे दाखवून दोन्ही अस्थापनांची वेतनश्रेणी लाटली आहे. 2008 पासून बामगुडे तापकीर माध्यमिक विद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याचे मस्टरवर दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र, त्यांच्या जागेवर त्यांचा सक्का भाऊ काम करत आहे. गेली कित्येक वर्षापासून शासनाची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे पुणे शिक्षण विभागाने संबंधित कर्मचा-यावर कारवाई करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड मनपातील शिक्षण मंडळ प्रशासनाला दिले आहेत.
महापालिकेतील शिक्षण मंडळाचे तत्कालीन प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी वाकड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. मात्र, पोलिसांना अपेक्षित माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने हा तपास रखडला आहे. हा तपास योग्य पध्दतीने करण्यासाठी पोलीस आणि मनपा प्रशासनात समन्वय नसल्यामुळे संबंधित कर्मचारी दोन पदांवर कार्यरत राहून दोन वेतन श्रेणी लाटत आहे. शासनाची फसवणूक करणा-या कर्मचा-याला प्रशासनाचेच पाठबळ मिळत असल्याचे मंदावलेल्या तपासावरून स्पष्ट होत आहे.
महापालिका शिक्षण विभागातील प्रशासनाने शाळेच्या संदर्भात अपूर्ण माहिती दिल्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. कागदोपत्री माहिती सादर केल्यास तपासाला गती येईल. संबंधित कर्मचा-यावर तातडीने गुन्हा दाखल केला जाईल.
सतिश माने, पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणेसंबंधित कर्मचारी करत असलेल्या प्रकाराबाबत वाकड पोलीस ठाण्यातील यंत्रणेकडे तक्रार केली आहे. आम्हाला ते बोलावून घेतात. परंतु, त्यांना जी काही माहिती अपेक्षित आहे. त्यांनी रितसर पत्रव्यवहार करून मागावी. ती बिनशर्त सादर केली जाईल.
पराग मुंढे, सहायक प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ