देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ मणिपूरमध्ये

- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला राष्ट्रपतींची मान्यता .
नवी दिल्ली – भारतातील पहिले क्रीडा विद्यापीठ मणिपूरमधील इंफाळमध्ये उभारण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाने तयार केलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. “राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक 2018′ ला राष्ट्रपती कार्यालयाने मंजुरी दिल्याचे समजते. 23 मे रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने क्रीडा विद्यापीठ उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.
क्रीडा क्षेत्रातील अद्ययावत शिक्षण, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, प्रशिक्षण यासारख्या सर्व सुविधा नवीन विद्यापीठात तयार केल्या जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या पहिल्या-वहिल्या अर्थसंकल्पात या क्रीडा विद्यापीठाचा प्रस्ताव समोर ठेवला होता. यासाठी केंद्र सरकारकडून 325.90 एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मणिपूरमधील पश्चिम इंफाळ जिल्ह्यातील कौत्रुक भागात हे विद्यापीठ उभारण्यात येणार आहे.