breaking-newsमहाराष्ट्र

देशभरात दरवर्षी गोवराचे ५० हजार बळी!

  • आरोग्य विभागाची लसीकरण मोहीम

जगभरात गोवर आजारामुळे दरवर्षी एक लाख ३९ हजार मृत्यू होतात. त्यापैकी ५० हजार मृत्यू भारतात होतात. गोवर (मिझेल) रुबेला हा विषाणूजन्य आजार २०२० पर्यंत भारतातून संपविण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २७ नोव्हेंबरपासून जालना जिल्ह्य़ात गोवर रुबेला लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले की, साधारणत: चार ते सहा आठवडे ही मोहीम चालणार आहे. ग्रामीण भागातील चार लाख ८७ हजार आणि शहरी भागातील एक लाख १७ हजार याप्रमाणे एकूण सहा लाख चार हजार बालकांना लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. नऊ महिने ते १५ वर्षांच्या दरम्यान वय असलेल्या बालकांना यात लस देण्यात येईल. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सहकार्याने पहिले दोन आठवडे शाळांमध्ये लसीकरण करण्यात येईल. त्यानंतरच्या काळात बाह्य़ संपर्क सत्रामध्ये अंगणवाडी आणि शाळाबाह्य़ बालकांचे लसीकरण करण्यात येईल. लसीकरण मोहिमेच्या काळात सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल. यापूर्वी जरी ही लस घेतली असली तरी ती पुन्हा घ्यावी लागणार आहे.

यापूर्वी देशातील १९ राज्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली आहे. जवळपास १० कोटी बालकांचे लसीकरण या १९ राज्यांमध्ये करण्यात आले. गोबर रुबेला आजारात बालकास हलका ताप, पुरळ, मळमळणे, सौम्य नेत्रदाह इत्यादी लक्षणे आढळतात. गोवर आजाराबद्दल  जनतेला साधारण माहिती असते. परंतु त्यानंतर होऊ शकणाऱ्या न्यूमोनिया, अतिसार, अंधत्व, मेंदू विकार इत्यादी आजारांची माहिती नसते.

गोबर रुबेला आजार गर्भवती महिलेस झाल्यास जन्मास येणाऱ्या बालकास डोळ्यांचे विकार होऊ शकतात. वारंवार गर्भपात, अकाली प्रसूती, जन्मजात अपंगत्व येण्याची शक्यता असते. मृत बालकही जन्मास येऊ शकते.

जालना जिल्ह्य़ात प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, महिला आणि बालकल्याण विभागाच्यामार्फत ही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी व लायन्स क्लब, डॉक्टरांच्या संघटना, स्वयंसेवी संस्था इत्यादींचे सहकार्य या मोहिमेसाठी लाभत आहे, असे बिनवडे म्हणाले.

जनतेच्या सहकार्याची अपेक्षा

जालना जिल्ह्य़ातील २२ लाख ११ हजार लोकसंख्येपैकी नऊ महिने ते पंधरा वर्षांच्या दरम्यान असलेल्या सहा लाख चार हजार बालकांना म्हणजे जवळपास ३० टक्के लोकसंख्येस गोवर-रुबेला लस देण्याचे नियोजन आहे. या विषाणूजन्य आजारापासून दूर राहायचे असेल तर सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत जनतेने सहभागी झाले पाहिजे. हे लसीकरण सुरक्षित आहे. ग्रामीण आणि शहरी भागासाठी आरोग्य विभागाने या लसीकरणासाठी नियोजन केलेले आहे.

डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक

लसीकरण प्रभावी उपाययोजना

गोवर हा विषाणूजन्य आजार असून खोकला त्याचप्रमाणे श्वसन संस्थेच्या माध्यमातून पसरतो. मिझेल रुबेला हा आजार गोवरानंतर तीन दिवस जरी राहत असला तरी तो बालकांसाठी हानिकारक ठरू शकतो.  गोवर व मिझेल रुबेला हे विषाणूजन्य आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागाने हाती घेतलेली लसीकरण मोहीम ही प्रभावी उपाययोजना आहे.

डॉ. बारडकर, जिल्हा साथ रोग अधिकारी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button