दुष्काळ जाहीर करण्याची नवी पद्धत शेतकरीविरोधी- धनंजय मुंडे

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सॅटेलाइटमुळे काही तालुके दुष्काळातून वगळले हे पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य अतिशय धक्कादायक आणि गंभीर आहे. मोदी आणि फडणवीस यांची दुष्काळ जाहीर करण्याची नवी पद्धत शेतकरी विरोधी आहे. विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या नव्या पद्धतीमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
जालना जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना, मंत्री लोणीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सॅटेलाइटमुळेच काही तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचे वक्तव्य केले. मोदींची सॅटेलाइट सेवा दुष्काळ कसा तपासते आणि त्यामुळे आपल्याकडील काही तालुके कसे वगळले जातात, हे लोणीकर यांनी उदाहरणासह समजून सांगताना या तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नसल्याचे जाहिररित्या मान्य केल्याचा आरोप मुंडे यांनी केला.