दुष्काळाच्या झळा, ६०० दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत भोजन

पुणे – दुष्काळी मराठवाड्यातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीअभावी जेवणाची भ्रांत असते. महिन्याचा खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागते. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमच्या कुलदीप आंबेकर या तरुणाने पुढाकार घेतला आहे. त्याने ‘स्टुडंट हेल्पिंग हँड’ ही संस्था सुरू केली आहे. संस्थेने दानशूरांच्या सहकार्याने दुष्काळी भागातील व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले अशा ६०० जणांच्या माेफत जेवणाची (मेस) व्यवस्था केली आहे. लवकरच ४०० जणांना सुविधा देणार आहे.
कोण आहे कुलदीप
कुलदीप मूळ भूम तालुक्यातील आंबी गावाचा असून त्याचे आर्इ-वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. ताे २०१४ मध्ये पुण्यात एमएस्सी केमिस्ट्रीचे शिक्षण घेण्यास आला. त्याच्या वडिलांनी सावकाराकडून ४० हजारांचे कर्ज घेतले होते. येथे राहताना विद्यार्थ्यांना उपाशीपाेटी राहून शिक्षण घ्यावे लागत असल्याचा अनुभव त्याने स्वत:ही घेतला. दुष्काळी भागातील मुलांना परीक्षा शुल्क माफ असूनही विद्यापीठ दाद देत नव्हते. आपल्यासारखे आणखी किती दुष्काळग्रस्त विद्यार्थी अडचणीत आहेत, याची माहिती त्याने ५-६ कॉलेजमध्ये जाऊन घेतली.
या दानशूरांचे लाभले सहकार्य
या कामात अनंत इंडस्ट्रीचे चेतन दहिया, जे.बी.केमिकल्स प्रा.लि.चे श्रीधर जाेशी, बारामती अॅग्राेचे राेहित पवार, माधवमुकुल फाउंडेशनचे रितू छाब्रिया, मुंबईतील केअरिंग फ्रेंड्स ग्रुपचे निमेश सुमिती, माजी सहायक पाेलिस आयुक्त सुरेश भाेसले यांनी आर्थिक हातभार लावला आहे.
१८०० विद्यार्थ्यांची यादी
मराठवाड्यातून पुण्यात आलेल्या सुमारे १८०० विद्यार्थ्यांचे नाव-गाव, माेबाइल क्रमांक, शिक्षण, त्यांचे आर्इ-वडील काय करतात, अशी माहिती त्याने गाेळा केली. या सर्वांच्या सह्या घेऊन त्याचे निवेदन कुलगुरूंना दिले. दुष्काळग्रस्त कृती समिती स्थापन करून विद्यापीठावर माेर्चा काढला. यानंतर विद्यार्थ्यांची फी माफ झाली. विद्यार्थ्यांच्या किमान दाेन वेळच्या जेवणासाठी सोय लावण्यासाठी त्याने ६-७ दानशूर व्यक्ती शाेधल्या. २०१४-१५ या वर्षात त्याने १८०० विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था केली. पुढील वर्षी केवळ २५० विद्यार्थ्यांचीच व्यवस्था करता आली.
मेसचे दरमहा २२०० रुपये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर
यंदा सुमारे २ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले. मात्र, ६०० विद्यार्थ्यांच्या मेसची व्यवस्था झाली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, कमवा व शिका याेजनेतील व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न लाखाच्या आत असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले. ६०० पैकी २०० विद्यार्थ्यांना काॅलेज परिसरात डबे पाेहोचवण्यात येत आहेत. ४०० जणांच्या बँक खात्यावर दरमहा २२०० रुपये जमा केले जात आहेत. ३० विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य घेण्यात आले आहे.
५० ते ६० मुलींना मेस
हेल्पिंग स्टुडंट हँडची सचिव संध्या साेनवणे म्हणाली, नगर जिल्ह्यातील जामखेड माझे गाव. पुण्यातील एमआयटीत मी एमकाॅमचे शिक्षण घेत आहे. दुष्काळी भागातून आलेल्या विद्यार्थिनी या प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मुली आहेत. त्यांच्यापुढे पुण्यात उदरनिर्वाहाचा माेठा प्रश्न असताे. संस्थेच्या माध्यमातून ५० ते ६० मुलींच्या मेसची व्यवस्था केली आहे.