breaking-newsपुणेमहाराष्ट्र

दिवाळी सुटय़ांमुळे एमटीडीसीचे रिसॉर्ट आरक्षित

न्याहारी-निवास योजनेलाही पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद

पुढील आठवडय़ापासून सुरू होणाऱ्या दिवाळीच्या सुटय़ांचे नियोजन पर्यटकांनी तीन महिने आधीच करून ठेवले असून, पुणे विभागातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन- एमटीडीसी) सर्व रिसॉर्ट फुल झाले आहेत. विशेष म्हणजे नवीन वर्षांच्या स्वागताचेही नियोजन पर्यटकांनी केले असून, नाताळच्या सुटय़ांसाठीही विभागातील रिसॉर्टमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण झाले आहे. तसेच एमटीडीसीच्या न्याहारी-निवास योजनेलाही यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

पुणे विभागात महाबळेश्वर, पानशेत, कार्ला ही ठिकाणे आहेत. तसेच माथेरान आणि माळशेज ही पर्यटनस्थळे गेल्या वर्षी पुणे विभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. सातारा जिल्हय़ातील महाबळेश्वर येथील एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये नेहमीच गर्दी असते. जिल्हय़ातील पानशेत आणि कार्ला या ठिकाणांनाही पर्यटकांची चांगली पसंती असते. कार्ला येथील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या रिसॉर्टमध्ये लग्न सोहळय़ासाठीही  आरक्षण केले जाते. पुणे विभागाकडून राज्य शासनाला चांगला महसूल प्राप्त होत असून, पुणे विभाग आघाडीवर आहे. गेल्याच वर्षी नव्याने दाखल झालेल्या दोन विभागांमुळे महसुलात भर पडत आहे, अशी माहिती एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.

काय आहे न्याहारी-निवास योजना

स्थानिकांना रोजगार मिळावा आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीकडून ‘न्याहारी निवास योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेत पर्यटनाच्या ठिकाणी खासगी जागा मालक आपली जागा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देतात. त्यामध्ये निवास आणि न्याहारी यांची व्यवस्था संबंधित जागा मालकाकडून पर्यटकांना देण्यात येते. अल्प खर्चात ही व्यवस्था होत असल्यामुळे पर्यटकांच्या खर्चाची बचत होते. संबंधित जागा मालकांना एमटीडीसीकडून प्रमाणपत्र देण्यात येते. या योजनेची आणि योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या ठिकाणांची माहिती ‘महाराष्ट्र टुरिझम’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्थानिक पर्यटनाला पसंती

सलग सुटय़ांमुळे अनेक कुटुंबे, युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिकही एमटीडीसीच्या माध्यमातून पर्यटनाचा आनंद घेतात. दूरवर जाण्यापेक्षा स्थानिक पर्यटनाला त्यांची पसंती असते. निवासाची चांगली सुविधा, सुरक्षिततेची हमी अशा विविध कारणांनी खासगी हॉटेलपेक्षा एमटीडीसीच्या हॉटेलना पर्यटकांची पसंती असते. एमटीडीसीकडे होणारे नव्वद टक्के आरक्षण ऑनलाइन होते. सुटय़ांसाठी शंभर टक्के, तर नव्या वर्षांच्या स्वागतासाठी ५० टक्क्यांपर्यंत आरक्षण झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button