दिवाळीपर्यंत सोने ३४ हजारांवर जाणार?

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होत असलेले अवमूल्यन आणि आंतरराष्ट्रीय भू-राजकीय आव्हानांचा परिणाम म्हणून येत्या दिवाळीत सोन्याचा भाव प्रतितोळा ३४ हजार रुपयांची कमाल पातळी गाठेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॉमट्रेंडज रिस्क मॅनेजमेंटचे संचालक ज्ञानशेखर त्यागराजन यांनी ही शक्यता व्यक्त केली.
भारतीय रुपयाचे अवमूल्यन होत असून डॉलर दिवसेंदिवस अधिकाधिक बळकट होत आहे. रुपयाच्या या अवमूल्यनाचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत असून दिवाळीपर्यंत यात वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भू-राजकीय आव्हानांचाही सोन्याच्या किंमतीवर परिणाम होत असतो. यामुळे भारतातही सोन्याचा दर उसळी घेईल, असे त्यागराजन म्हणाले.
शेअर बाजारातून चांगला परतावा मिळत असल्याने सोन्यात होणाऱ्या गुंतवणुकीत घट झाल्याचे दिसत आहे. सोन्याच्या किंमतीवर याचाही परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. गेल्या आठवडाअखेर म्हणजे शुक्रवारी सोन्याचा भाव प्रतितोळा ३१,०१० होता. तर, एका डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा विनिमय दर ६७.५२ रुपये होता.