दावेदार असणारे परमेश्वर अखेर उपमुख्यमंत्रिपदी

बंगळूर – कर्नाटकमधील कॉंग्रेसचा दलित चेहरा आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जी.परमेश्वर यांच्याकडे बऱ्याचदा उपमुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले गेले. आता त्या राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीत अखेर परमेश्वर यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे.
कॉंग्रेसचे निष्ठावान अशी ओळख असणारे परमेश्वर प्रदीर्घ काळ म्हणजे ऑक्टोबर 2010 पासून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. सभ्य आणि सौम्य व्यक्तिमत्व लाभलेले परमेश्वर चांगल्या कौटूंबिक पार्श्वभूूमीतून आलेले शिक्षणतज्ञ आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी विविध क्षेत्रांत योगदान दिले. पीएचडी, एमएससी असे शिक्षण घेतलेल्या परमेश्वर यांची 1989 मध्ये माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्याशी भेट झाली अन् त्यांचे नशीबच पालटून गेले. राजीव यांनी परमेश्वर यांच्यातील क्षमता जोखून त्यांना राजकारण प्रवेशाचे निमंत्रण दिले. ते स्वीकारत परमेश्वर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. आतापर्यंत ते पाचवेळा कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले आहेत.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना 2013 मधील विधानसभा निवडणुकीत परमेश्वर यांच्याकडे थेट मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणूून पाहिले गेले. दुर्दैवाने त्यांच्या त्या निवडणुकीत पराभव झाला. असे असूनही त्यांना विधान परिषदेवर पाठवले गेले आणि सिद्धरामय्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीही बनवण्यात आले. कॉंग्रेस-जेडीएस आघाडीपुढील मार्ग खडतर असल्याची जाणीव परमेश्वर यांना आहे.
आघाडीसाठी पुढील काळ अवघड असला तरी भाजपला सत्तेपासून रोखणे गरजेच होते, अशी सुज्ञ प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिल्याचे ते म्हणतात. आता कुमारस्वामी-परमेश्वर ही जोडगोळी कशी कामगिरी करते यावर आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.