दारू आणण्यास नकार दिल्याच्या कारणावरून रहाटणीत खुनाचा प्रयत्न

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – दारू आणण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोघांनी धारदार कोयत्याने एकावर वार केले आहेत. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रहाटणीत बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.
प्रशांत खराडे (वय २६, रा. रहाटणी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याचा मावसभाऊ प्रदीप श्रीमंत गोडगिरे (वय २७) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बापू सातपुते आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत आणि त्याचा मित्र सुमित जोशी बुधवारी दुपारी चारच्या सुमारास गजानन कॉलनी येथील मैदानात बसले होते. बापू आणि त्याचे दोन साथीदारांनी त्यावेळी सुमितला दारू आणण्यास सांगितले. सुमितने दारू आणण्यास नकार दिला. यावरून बापूने सुमितला हाताने मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास गजानन चौक येथे बापू आणि त्याच्या दोन साथीदारांनी प्रशांतच्या डोक्यात, मानेवर, पाठीवर आणि पायावर कोयत्याने सपासप वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी सध्या फरार आहेत. वाकड पोलीस तपास करत आहेत.